आमदार महानाट्य करंडक २०२५
ग्रामीण रंगभूमीची माहिती
मराठी माणूस आणि नाटक यांचं नातं अतूट आहे. हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक हे तीन वेग-वेगळे नाटकाचे प्रकार केले जातात आणि ह्यात प्रायोगिक व व्यावसायिक नाटकाला भरघोस अशी सामाजिक तसेच आर्थिक प्रतिष्ठा प्राप्त आहे. हौशी नाटक वाले आपल्या हौसेखातर स्पर्धा करत व्यावसायिकच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात, पण या सगळ्यात मूळ नाट्यप्रवाह कितीतरी दूर राहिली गावागावातील पारंपरिक नाट्यकला, म्हणजेच ग्रामीण रंगभूमी.
जसे कोकणात दशावतार, नमन आहे, तसेच रायगड जिल्ह्यातील कित्येक गावागावांत नाटकाचा खेळ करणारी नाट्य मंडळे आहेत. ही मंडळ गावागावातील सण, उत्सव, यात्रा या निमित्ताने नाटकाचा प्रयोग करतात. काम, धंदा, शेती, नोकरी हे सगळे करून रात्री जागून तालीम करून नाटकाचा प्रयोग यशस्वी करतात. जवळजवळ 100 वर्षांची नाट्यपरंपरा असणारी नाटक मंडळे अलिबाग तालुक्यात अजूनही कार्यरत आहेत. याची दखल सांस्कृतिक विभागाने घेतलेली नाही, म्हणूनच आज ही ग्रामीण नाट्यपरंपरा हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
नाटक सादरीकरणाची पारंपरिक चौकट, गावागावातील राजकीय सामाजिक स्थित्यंतरे, वाढता आर्थिक बोजा, नव्या पिढीचे दुर्लक्ष, आदी कित्येक कारणाने ही नाटक मंडळे बंद पडत आहेत. या ग्रामीण रंगभूमीनेच महाराष्ट्राच्या कलाविश्वाला कितीतरी अष्टपैलू कलाकार मिळवून दिले. ती ग्रामीण रंगभूमी आता जीर्ण होऊ लागली आहे, म्हणूनच नुकताच जागतिक रंगभूमी दिनानिमित्ताने कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबागच्या वतीने तालुक्यातील गावा-गावातील नाटक मंडळींना एका व्यासपीठावर आणून सन्मानित करण्यासाठी "गौरव नाट्यकलेचा सन्मान सोहळा 2025" चे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास भरघोस असा प्रतिसाद मिळाला. 25 हून अधिक मंडळांनी सहभाग घेतला आणि पुन्हा एकदा कालबाह्य होत जाणारी ग्रामीण नाट्यसंस्कृती नव्याने चर्चेत आली.
याच कार्यक्रमाची दखल अलिबागचे आमदार माननीय महेंद्र शेठ दळवी यांनी घेतली असून ग्रामीण नाट्यपरंपरा पुनर्जीवित करण्याच्या उद्देशाने ग्रामीण नाटक मंडळींना नाट्य महोत्सव आयोजित करण्याची घोषणा केली आहे.




आपल्या अलिबाग तालुक्यातील कित्येक गावा गावातील नाट्य मंडळानी जो भरघोस प्रतिसाद दिला त्या बद्दल आपल्या सर्व नाट्यकर्मींचे मनःपूर्वक आभार...🙏🏼
तसेच आत्ता पर्यंत नोंदणी केलेल्या अलिबाग तालुक्यातही सर्व ग्रामीण नाट्य मंडळांना होणाऱ्या दोन अंकी नाट्य स्पर्धेसाठी शुभेच्छा
१७/०४/२०२५ रोजी रात्री १२ वाजता प्रवेश प्रक्रिया बंद झाली आहे...
पुढील नियोजन व माहिती लवकरच आपल्या पर्यंत पोहचेल..
धन्यवाद
कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था